Sunday, 10 May 2020

यशस्वी दुग्धोत्पादनातील पंचसूत्री गाई - निरोगी प्रजनन संस्था ः निरोगी पचन संस्था ः स्वच्छ गोठा ः स्वच्छ दूधनिर्मिती ः Mane Livestock farming Pvt Ltd in Maharashtra India Agriculture jobs

यशस्वी दुग्धोत्पादनातील पंचसूत्री

गाई -

म्हशींच्या कासेचे आरोग्य राखण्यासाठी धार काढणारी व्यक्ती निरोगी हवी. धार काढताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत. हाताची नखे वाढू देऊ नयेत. आजारी व्यक्तीने धार काढू नये. अंगठा मुडपून दूध काढू नये, कारण त्यामुळे सडास अंतर्गत भागात जखमा होऊन जंतूसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. म्हणून मूठबंद पद्धतीने दूध काढावे. दूध पूर्ण काढावे. कासेत दूध राहिल्यास काससुजीला आमंत्रण मिळते. दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ धुऊन कोरडी करावी. कास धुण्यासाठी स्वच्छ पाण्यात एक टक्का पोटॅशिअम परमॅंगनेट मिसळावे. पहिल्या काही धारांमध्ये जिवाणूंचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे असे दूध कासेला किंवा हाताला लावू नये. कास सुजी झालेली गाय सर्वांत शेवटी पिळावी. कास सुजीतील दूध गोठ्यातील जमिनीवर काढू नये. असे दूध वेगळ्या पातेल्यात काढून गोठ्यापासून लांब पुरून टाकावे. धार काढल्यानंतर सडाची छिद्रे अर्धा तास उघडी राहतात, त्यामुळे जनावराला अर्धा तास खाली बसू देऊ नये. दूध काढल्यानंतर जनावराला वैरण टाकल्यास जनावर खाली बसत नाही आणि गोठ्यातील शेणा-मातीतील जंतू कासेत प्रवेश करण्यास प्रतिबंध होतो. गाभण गाय आटवत असताना प्रत्येक सडात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविक सोडावे. वासरांचे संगोपन वेगळे करावे. लांब सड व लोंबती कास असलेल्या गाई / म्हशी घेऊ नयेत. दर पंधरा दिवसांनी गोठ्यातच कासदाहासाठी (सी.एम.टी.) चाचणी करावी. दुधात कोणताही बदल दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

निरोगी प्रजनन संस्था ः


जनावरांच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी दरवर्षी सांसर्गिक गर्भपाताची चाचणी करून घ्यावी. नोंदणीकृत व जबाबदार पशुवैद्याकडून कृत्रिम रेतन करावे. वार अडल्यास स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीकडून वार काढल्यास गर्भाशयास इजा होण्याची शक्‍यता असते. जनावरांना योग्य मात्रेत खनिजद्रव्ये दिल्यास उलटण्याचे प्रमाण कमी होऊन प्रजनन संस्थेचे आरोग्य टिकून राहते. गर्भाशयाचे गंभीर आजार झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे करावे. गर्भपात झालेले गर्भ आणि वार गोठ्यापासून लांब पुरून टाकावे. आजारी जनावरांना योग्य उपचार करावेत.

निरोगी पचन संस्था ः


वैरण जमिनीवर न टाकता गव्हाणीत टाकावी. वैरणीची कुट्टी करून द्यावी. कुट्टी करत असताना बोटभर लांब तुकडे करावेत. फार बारीक तुकडे करू नयेत. जनावरांना फक्त ओला किंवा फक्त वाळका चारा देऊ नये. एकाच प्रकारचा चारा दिल्यास जनावराचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे चाऱ्यात पुरेशी लाळ मिसळली न गेल्याने पोटाचे विकार संभवतात. जनावरांना एकाच वेळी जास्त वैरण न देता दिवसातून चार ते पाच वेळा थोडी थोडी वैरण द्यावी. जनावरांना उकिरड्यावर चरू देऊ नये. जनावराला स्वच्छ व ताजे पाणी द्यावे, साचलेले घाण पाणी देऊ नये. गोठ्यातील सर्व जनावरांचे नियमित जंतनाशन करावे. समतोल आहार देण्याचा प्रयत्न करावा. पचन संस्थेच्या सांसर्गिक रोगांपासून ग्रस्त जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवावीत. पचन संस्थेच्या कुठल्याही विकारावर तत्काळ उपाययोजना करावी.

स्वच्छ गोठा ः


गोठा स्वच्छ, कोरडा, हवेशीर व उबदार ठेवावा. गोठ्यात ओलावा वाढल्यास जंतूंची वाढ होते. गोठ्यात पुरेसा प्रकाश असावा. शेण - मूत्र साठू देऊ नये. आजारी जनावराची विष्ठा, मूत्र, उरलेला चारा जाळून टाकावा. आजारी जनावराची वेगळी व्यवस्था ठेवावी. गोठ्यात वैरण / उरलेली वैरण साचू देऊ नये. शक्‍य झाल्यास जनावरांना रोज धुऊन खरारा करावा, त्यामुळे परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. रक्ताभिसरणाला चालना मिळून ताजेपणा वाटतो. रोगी जनावरांना त्वरित उपचार करावा. उन्हाळ्यात गोठा थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. खंगत जाणाऱ्या जनावरांची चाचणी करून घ्यावी. आठवड्यातून एकदा पाण्याचा हौद धुऊन चुन्याने रंगवून घ्यावा. पाण्यात शिफारशीत निर्जंतुक औषधी योग्य प्रमाणातच टाकावी. जनावरांचे लसीकरण नियमित करावे.

स्वच्छ दूधनिर्मिती ः


रोगी व अस्वच्छ जनावरांपासून स्वच्छ दूध मिळत नाही. दूध स्वच्छ नसल्यास टिकवणक्षमता कमी होऊन दूध नासते. म्हणून जनावरे निरोगी व सशक्त असावीत. दूध काढताना प्रत्येक सडातील चार - पाच धारा वेगळ्या भांड्यात काढाव्यात. हे दूध इतर दुधात मिसळू नये. दूध काढताना जनावराला कोरडा आणि उग्र वास असलेला चारा देऊ नये. दूध काढण्याची जागा स्वच्छ व धूळमुक्त असावी. त्या ठिकाणी माश्‍या व डासांचा प्रादुर्भाव नसावा. दुधाची भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेली असावीत. दुधाची भांडी दररोज धुण्याच्या सोड्याने गरम पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावीत आणि कोरडी करावीत. दूध काढून झाल्यानंतर ते गोठ्यातून त्वरित हलवावे. दूध गाळून थंड ठिकाणी (शक्‍य असल्यास बर्फाच्या पेटीत) ठेवावे. दूध काढल्यानंतर सड निर्जंतुक द्रावणात बुडवून घ्यावेत आणि दूध लवकरात लवकर संकलन केंद्रात पोचवावे.
---------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

No comments:

Post a Comment

टर्की संवर्धन / पालन कोंबडीच्‍या पिल्‍लाच्‍या तुलनेत टर्कीच्‍या गरजा उर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन आणि खनिजे ह्या उच्‍च आहेत. दोन्‍ही लिंगांसाठी...